मुंबई : पुण्यातील एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली.
या बैठकीत महिलांच्या सुरक्षेसाठी पुढील महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या: 112 महिला हेल्पलाइनचा प्रभावी प्रचार – एसटी बसमध्ये स्टिकर्स तसेच एसटी डेपोमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली जाईल. प्रत्येक एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची दक्षता घेण्यात येईल. शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक एसटी स्थानकाबाहेर रिक्षा स्टँड असावा आणि तो सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असावा, जेणेकरून रात्री-अपरात्री महिलांना सुरक्षित घरी जाता येईल. एसटी बस तसेच खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव. प्रत्येक बस डेपोमध्ये पोलिसांची बीट उभारण्याचा विचार. बंद पडलेल्या बसेस आणि निर्जन ठिकाणी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी गस्त घालावी. बस पार्किंगमध्ये असताना दरवाजे लॉक आणि खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना, जेणेकरून बसचा गैरवापर होणार नाही.
चित्रा वाघ म्हणाल्या, सरकारने कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्या 23 सुरक्षारक्षकांवर निलंबनाची कारवाई केली असून, आरोपीला अटक करण्यासाठी सक्षम यंत्रणा काम करत आहे. “महिला सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील असून, राज्यातील महिलांवर अन्याय होणार नाही याची खात्री आहे,” असे आमदार चित्रा वाघ यांनी सांगितले.
तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली एसटी प्रवास सुरक्षित करण्यासाठी लवकरच एक मजबूत SOP (Standard Operating Procedure) तयार केली जाणार आहे.
“महिला प्रवासी सुरक्षित आणि निर्धास्त प्रवास करू शकतील यासाठी महायुती सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील राहील,” असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.