मुंबई : राज्यात गुटखा बंदी असतानाही तो खुलेआम विकला जात आहे, मात्र यावर कठोर कारवाई होत नाही, अशी टीका काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून सरकारवर केली.
वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्न विचारत म्हटले की, इतर राज्यांत गुटख्यावर बंदी नाही, पण महाराष्ट्रात बंदी असतानाही तो सहज मिळतो. गुजरातमार्गे मोठ्या प्रमाणावर गुटखा राज्यात येतो, महसूल बुडतो, तरीही प्रशासन कारवाई करत नाही. पोलिसांनी मनावर घेतले, तर गुटख्याची एकही पुडी विक्रीसाठी उपलब्ध राहणार नाही, तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात गुटखा सर्रास मिळतो, यामुळे लोकांच्या आरोग्याला मोठा धोका आहे.
या आरोपांना उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, गुटख्याविरोधात कारवाई सुरू आहे, मात्र विभागात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची कमतरता आहे. ही रिक्त पदे दोन महिन्यांत भरली जातील आणि गुटखा विक्रीविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाईल. तसेच कोणत्याही व्यापारी, विक्रेते किंवा पुरवठादारावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.