वाराणसी
ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरात पूजा केल्यानंतर सर्वसामान्य भाविकांनी पोलिसांच्या उपस्थितीत दर्शन घेतलं. वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात तब्बल 31 वर्षानंतर व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीशाच्या आदेशानंतर काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्याकडून ही पूजा करुन घेतली. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चा केली.
कोर्टाने याबाबत आदेश देताना ७ दिवसांची मुदत दिली होती. मात्र कोर्टाच्या आदेशाच्या १२ तासात व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यात आली.
या प्रकरणाबाबत हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, ज्ञानवापी प्रकरणात हे मोठं यश आहे. याआधीही व्यासजींच्या तळघरात पूजा झाली होती. नोव्हेंबर 1993 नंतर ते चुकीच्या पद्धतीने बंद करण्यात आले. कोणताही लेखी आदेश न देता पूजा बंद करण्यात आली आणि बॅरिकेड्स लावण्यात आले. अखेर काल ‘व्यासजींच्या तळघरात’ पूजा करण्यात आली आहे.
पूजा कार्यक्रमात सहभागी झालेले व्यास कुटुंबातील सदस्य जितेंद्र नाथ व्यास यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या स्थित नवनिर्मित मंदिरात रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त काढणारे गणेश्वर द्रविड यांच्या नेतृत्वात बुधवारी रात्री उशिरा काशी विश्वनाथ मंदिरात पुजाऱ्यांनी व्यास जींच्या तळघरात पूजा करवून आणली. यादरम्यान जिल्हाधिकारी एस राजलिंगम, मण्डलायुक्त कौशल राज शर्मा आणि पोलीस आयुक्त अशोक मुथा जैना यांच्यासह अनेक ट्रस्टी उपस्थित होते.