मुंबई- हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय. यावेळी वर्षा बंगल्याच्या परिसरात हेमंत पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यापाठोपाठ हेमंत पाटील यांच्या समर्थकांनीही तिकिटासाठी वर्षा बंगल्याबाहेर शक्तिप्रदर्शनाचा मार्ग स्वीकारल्याचं दिसतंय. तर या शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांनी हेमंत पाटील यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासन दिलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत हिंगोलीच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
हिंगोलीत महायुतीत काय तिढा
हिंगोली लोकसभेची जागा शिंदेंच्या शिवसेनेची आहे. या ठिकाणाहून हेमंत पाटील यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली होती. मात्र पाटील यांच्या उमेदवारीला भाजपाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. तसचं सर्वेत हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास, जागा अडचणीत येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळं हेमंत पाटील यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराची शोधाशोध होत असल्याची चर्चा होती. त्यामुळं हेमंत पाटील यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हिंगोलीत उमेदवार बदलला तर त्याचा फटका नांदेड मतदारसंघातही दिसेल असा इशारा देण्यात आला आहे.
२०० वाहनांसह थेट मुंबईत दाखल
हेमंत पाटील यांचे समर्थ २००पेक्षा जास्त वाहनांचा ताफा घेऊन मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजीही करण्यात आली. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटील आणि समर्थक यांची भेट घेऊन अन्याय होऊ देणार नाही हे आश्वासन दिलंय.
हेही वाचाःचंद्रपुरात मुनगंटीवारांना महायुतीतूनच आव्हान?, का संतापलेत मुनगंटीवार?