मुंबई
शिंदे गटाचा व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशा मागणीवरुन शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या १३ आमदारांविरोधात ही याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
ठाकरे गटाच्या कोणत्या आमदारांचा समावेश
ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील, राजन साळवी, राहुल पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर आणि अजय चौधरी यांचा समावेश आहे.
ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. यावेळी राहुल नार्वेकरांनी शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचं सांगितलं. आणि दोन्ही गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली नाही. यावर ठाकरे गटानेही आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात फेरफार करून विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.