मुंबई
सोसायटीत माझ्या आईला कधीच पुजेला बोलवत नव्हते, माझी आई घरात एकटीच बसून असायची; असं म्हणताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चातुवर्ण व्यवस्थेवर बोट ठेवले. काही दिवसांपूर्वी राम मांसाहार करीत असल्याच्या वक्तव्यावरुन राज्यभरातून त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा आव्हाडांचं वक्तव्य वादात सापडलं आहे.
यावेळी आव्हाड म्हणाले, आजही वाईट वाटतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेतही आरक्षण ठेवायला पाहिजे होते. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर अन्याय केला. न्यायपालिकेतील निर्णय अशी येतात की लगेच त्यातून जातीचा वास येतो. आजही जातीव्यवस्था प्रत्येक क्षेत्रात काय आहे.
ज्यांना समाजाने मान्यता दिलेली नाही, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण आणलं. ज्याला घर नाही, शेती नाही अशा वर्गासाठी आरक्षण आलं. आज सर्व शाळांमध्ये खासगीकरण सुरू आहे. मुलं कुठे शिकायला जातील? शाळांचं एकत्रिकरण केलं जातंय, त्यामुळे शाळा लांब असेल तर मुलं शाळेत कशी जातील. असं सुरू राहिलं तर फुले, शाहुंचा महाराष्ट्र अशिक्षित होईल, असं म्हणत त्यांनी सध्याच्या सरकारवर हल्लाबोल केला.
मूर्ती सापडली त्यापासून ३ किमी दूर राम मंदिर
राम मंदिराचा शिलान्यास राजीव गांधींनी केला होता. इतिहासात दुसऱ्यांदा शिलान्यास केला जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार, ज्या जागेवर मूर्ती सापडली त्यापासून तीन किलोमीटर दूर मंदिर बांधलं जात आहे. आम्ही २२ तारखेला का दर्शन घेऊ? आम्ही २३ ला घेऊ नाहीतर २४ ला दर्शन घेऊ. निमंत्रण का पाठवताय? राम आमचा आहे, मंदिर आमचं आहे.. जेव्हा हवं तेव्हा मंदिरात जाऊ. देशाच्या राष्ट्रपती दौपद्री मूर्मू यांना अशावेळी बोलावलं जात नाही. संसदेच्या उद्घाटनालाही मूर्मूंना का बोलावलं नाही?