मुंबई
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत एकाच गाडीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे मागच्या सीटवर आणि एकनाश शिंदे गाडी चालवताना दिसत आहेत. मात्र मागे चक्क चौघेजणं बसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांना दाटीवाटीने बसावे लागत असल्यावरुन सुषमा अंधारेंनी दिलेली कॅप्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
‘जर केली नसती सुरत गुवाहाटी, तर कशाला झाली असती दाटीवाटी’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या म्हणून ठळक ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी 28 जुलै 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले, प्रबोधन यात्रा काढली. त्यांच्या या यात्रांना राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांची वक्तृत्व कला, भाषणाची पद्धत आणि सडेतोड वृत्तीमुळे अनेकांना भावते.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत सुषमा अंधारे विरूद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत पाहायला मिळू शकते.