मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवाल २०२४’चे अनावरण करण्यात आले.
मुख्य सचिव, संबंधित विभागांचे अधिकारी, जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनावर विशेष भर देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे शासन पारदर्शक, कार्यक्षम आणि लोककेंद्रीत करण्यावर भर दिला. यानुसार महाराष्ट्रामध्ये नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ‘आपले सरकार पोर्टल’ सुरू करण्यात आल्याचे देखील यावेळी त्यांनी नमूद केले. यासोबतच केंद्र सरकारच्या सहयोगाने डीजीजीआय या निर्देशांकामध्ये सर्वसमावेशक पद्धतीने जिल्ह्यांचे तसेच विभागांचे निर्देशांक आणि कामाचे मूल्यमापन करत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सुमारे १० विकासक्षेत्रांमध्ये १६१ निर्देशकांवर आणि ३०० हून अधिक डेटापॉईंट्स यांच्या विश्लेषणातून ‘महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक’ तयार करण्यात आला आहे. डेटा केंद्रित योजना आणि अंमलबाजवणीचे फायदे या काळात लक्षात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यासोबत आता आयटी आणि एआय टूल्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे या माध्यमातून शासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोककेंद्रीत करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. प्रादेशिक समतोल साधून राज्याच्या प्रगतीमध्ये संतुलन आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पालक सचिव देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
आपण किती प्रकल्प करतो यापेक्षा आपण कसे शासन करतो हे महत्त्वाचे आहे. राज्याची प्रगती त्यातील ‘इज ऑफ लिव्हिंग’ने ठरते. महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होत असताना लोककेंद्रीत शासन करणे गरजेचे आहे. म्हणूनच हे निर्देशांक सुधारणेसाठी गरजेचे असल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. या अहवालानुसार निर्देशकांच्या बाबतीत घसरण झालेल्या विभागांना अधिक मेहनत घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
हा सर्वसमावेशक निर्देशांक तयार केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.