अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्यांचा मोठा पक्षप्रवेश; रविंद्र चव्हाण नवे अध्यक्ष
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीबद्दल नाराजी व्यक्त करत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे शेकडो सदस्य मंगळवारी भाजपमध्ये सहभागी झाले. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. या प्रवेशामागे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचा पुढाकार होता.
याच कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कारही करण्यात आला.
या वेळी इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया, बीडब्ल्यूएफएस यांसारख्या नामांकित विमान सेवा व ग्राउंड हँडलिंग कंपन्यांमधील कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सदस्यांनी स्पष्ट केले की, “गेल्या दीड वर्षांपासून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून अन्याय होत होता. सतत दुर्लक्ष आणि निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकतेमुळे आमचा विश्वास डळमळीत झाला. त्यामुळेच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत.”
अध्यक्षपद स्वीकारताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वानुसार मी कामगारांच्या हितासाठी जीव तोडून काम करीन. आज ज्यांनी भाजपची विचारधारा स्वीकारली आहे, त्यांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणू.”
कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष जितेंद्र राऊत व सरचिटणीस सुहास माटे यांनी सांगितले की, “गेल्या दीड वर्षांपासून दोन राजकीय पक्षांच्या संघर्षात कामगार भरडले जात होते. मात्र, चव्हाण यांच्या नेतृत्वातच कामगारांना न्याय मिळू शकतो, याची आम्हाला खात्री आहे.”
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये योगेश आवळे, निशांत गायकवाड, विनोद घोगले, प्रशांत वर्तक, हर्षित तासकर, दिनेश शेवाळे, करण कांबळे, धनंजय कांबळे, युवराज ढोरे, अक्षय काळभोर, अजित आचरेकर, सतीश बांदल, सुधीर पवार, महेश मोरे यांचा समावेश होता.
या घडामोडींमुळे कामगार संघटनेचे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलले आहे, आणि आगामी काळात त्याचे प्रत्यक्ष राजकीय परिणाम उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.