मुंबई — “मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे. येत्या 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात पदावर निश्चितपणे कार्यरत राहीन. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार दिल्लीला जायचे का, हे ठरेल,” असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांसोबतच्या दिवाळी सुसंवादात केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मनमोकळ्या वातावरणात सहज, विनोदी शैलीत संवाद साधला.
“मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझे सारखेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे दोघेही जाणतात. राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू पुन्हा एकत्र आले तर त्यात काही वाईट नाही. उलट त्यांना एकत्र आणण्याची भूमिका मीच घेतली होती,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राज्याच्या राजकारणाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राचे राजकारण काही काळ वैयक्तिक वैरावर आले होते, परंतु आता ते निवळले आहे. राज्य मंत्रीमंडळात उत्तम समन्वय असून कोणताही बदल होणार नाही. गुजरातसारखा बदल होईल का, या प्रश्नावर मी स्पष्ट सांगतो — नाही होणार.”
विरोधकांनी मतदार याद्यांतील त्रुटींबाबत घेतलेल्या आक्षेपांवर फडणवीस म्हणाले, “मतदार याद्या अद्ययावत होणे ही आमचीही भूमिका आहे. मुंबईत सतत स्थलांतरे होत असल्याने नावे कधी दोन ठिकाणी दिसतात, पण एकाच व्यक्तीचे मतदान दोन ठिकाणी होत नाही. विरोधकांनी घेतलेले आक्षेप निराधार आहेत; आम्ही लवकरच त्यांची उत्तरे देऊ, आणि सत्य बाहेर येईल.”
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत ते म्हणाले, “राज्यात दीर्घकाळानंतर निवडणुका होत आहेत. तळागाळातून प्रचंड मागणी आणि तयारी आहे. आता जे विरोधक सहा महिने निवडणुका पुढे ढकला म्हणत आहेत, ते केवळ वेळ काढण्यासाठी आहे. जर त्या पुढे ढकलल्या गेल्या, तर जनता संताप व्यक्त करेल.”
मेट्रो प्रकल्पाविषयी विचारता मुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय दिल्यानंतर आम्ही वेगाने काम सुरू केले. दिल्ली मेट्रोचा सखोल अभ्यास केला आणि तज्ज्ञ ई. श्रीधरन यांचे मार्गदर्शन घेतले. देशभर भूमिगत मेट्रो सर्वत्र फायदेशीर ठरणार नाही, या मताचा गंभीरपणे विचार केला जाईल.”

