मुंबई : – “मी घेतलेल्या कोणत्याही विकास प्रकल्पांना स्थगिती देत नाही, कारण मी उद्धव ठाकरे नाही,” अशा परखड शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत सुनावले.
त्याचवेळी त्यांनी “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या कोणत्याही निर्णयांना स्थगिती दिली नाही,” असेही स्पष्ट केले. “मंत्रालयीन किंवा विभागीय स्तरावर काही ठराव स्थगितीला गेले असले, तरी त्यासाठी मी जबाबदार नाही. मात्र, माध्यमांमध्ये माझ्याविरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे,” असा आरोप करत त्यांनी विरोधकांना ठणकावून उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले की, “जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी आणि अजित पवारही निर्णय प्रक्रियेत सहभागी होतो. त्यामुळे कोणत्याही निर्णयाची जबाबदारी केवळ शिंदे यांची नाही, तर ती आमची संयुक्त आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी चर्चेदरम्यान काही प्रतिक्रिया दिली असता, फडणवीसांनी मिश्किल टोला लगावत म्हटले – “जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असता! तुम्ही ना अजितदादांचे ऐकता, ना माझे!” या वक्तव्यावर सभागृहात हशा पिकला.
फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील काही नेते सातत्याने गुजरातचे उदाहरण देतात, त्यामुळे आता गुजरातला स्वतःची जाहिरात करण्याचीही गरज नाही!” त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केले की, “गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्राने फक्त ९ महिन्यांत मिळवली आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल १,३९,४३४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. हा आकडा गुजरात, दिल्ली आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा अधिक आहे.”
फडणवीस यांनी सांगितले की, “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेत महाराष्ट्राने विक्रमी गुंतवणूक आकर्षित केली आहे. महाराष्ट्राच्या पॅव्हिलियनबाहेर उद्योगपतींची मोठी गर्दी होती. मात्र, विरोधक आम्हाला दोष देतात की आम्ही भारतीय कंपन्यांशीच करार केले. पण आदित्य ठाकरे जेव्हा दावोसला गेले होते, तेव्हाही अनेक भारतीय कंपन्यांशीच करार झाले होते. विशेष म्हणजे, त्यातील अनेक कंपन्या नंतर प्रकल्पातून माघारी गेल्या.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. यावर काही सदस्यांनी टोमणे मारले असता, त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले – “हे गुलाबी जॅकेट मला अजितदादांनीच शिवून दिलंय!” त्यांच्या या विधानावर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले की, “महाराष्ट्र अजूनही उद्योग, रोजगार आणि परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत देशात क्रमांक एकवर आहे. विरोधक कितीही नकारात्मकता पसरवत असले तरी सत्य वेगळे आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या परखड शैलीत विरोधकांना प्रत्युत्तर देत महाराष्ट्राच्या विकासावर सरकारचा भर आहे, हे स्पष्ट केले. त्यांच्या उत्स्फूर्त उत्तरांमुळे विधानसभेत रंगतदार चर्चा रंगली.