मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले (Hatkanangale )आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूर आणि हातकणंगले दौऱ्यावर होते . आगामी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आज त्यांनी या दोन्ही मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून पंतप्रधानांचे हात बळकट करण्याचं आवाहन केलं आहे . तसेच महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे . ते म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत केलेलं काम महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवलं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल असा हल्लाबोल त्यांनी आज कोल्हापुरात बोलताना चढवला आहे .
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला नेता निवडता आला नाही. त्यामुळे कणखर पंतप्रधान असलेल्या मोदींना आपलं मत देऊन देशाची प्रगती उंचावर नेऊ असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे . 2019 वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष म्हणूनसुद्धा संख्याबळ मिळालं नाही. गेल्या दहा वर्षांत देशात कोणताही घोटाळा झाला नाही किंवा बॉम्बस्फोटही झाला नाही. हे सर्व पंतप्रधान मोदी यांची कमाल आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे . यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, भाजपा खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) आहेत . त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आले पाहिजेत, यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत . तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनीही रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज प्रकाश आवाडे यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे .मात्र यावर तब्बल 45 मिनिटे बैठक होऊनही आवाडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीसमोर (MahaYuti )मोठा पेच निर्माण झाला आहे . .