मुंबई: शैक्षणिक आणि वैद्यकीय व्हिसावर भारतात येऊन कालावधी संपल्यानंतरही अवैध वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कारवाई तीव्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
प्रश्नोत्तर तासात भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी नालासोपारा परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा आणि त्यांचा अमली पदार्थ तस्करीतील सहभाग याबाबत प्रश्न उपस्थित केला.
“अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विदेशी नागरिक आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई होणार का? तसेच अवैध पबवर कारवाई केली जाणार का?” असा सवाल त्यांनी केला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गेल्या महिन्यात ६८ विदेशी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्यात आले, तर सध्या १२२ जण तात्पुरत्या निवास केंद्रात आहेत. अवैधरित्या राहणाऱ्या विदेशी नागरिकांचे पासपोर्ट आणि प्रवास कागदपत्रांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.”
ते पुढे म्हणाले, “ज्यांचे पारपत्र कालबाह्य झाले आहे, त्यांना तात्पुरत्या निवास केंद्रात ठेवून त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया राबवली जाईल. तसेच अवैध वास्तव्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.”
मुंबईत येणाऱ्या विदेशी नागरिकांच्या वास्तव्याची मुदत पोलिसांकडून नियमित तपासली जाईल आणि कालावधी संपल्यानंतर ते परत गेले का, याची पडताळणीही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चेत विलास तरे, नाना पटोले आणि हेमंत ओगले यांनीही सहभाग घेत मुद्दे उपस्थित केले.


zoritoler imol
March 17, 2026I always was interested in this topic and stock still am, appreciate it for posting.