मुंबई : एसटी महामंडळाने १४.९५% प्रवासी भाड्यात वाढ केल्यानंतर आता राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील टोल टॅक्समध्येही १ एप्रिलपासून पाच ते दहा रुपयांची वाढ होणार आहे. यामुळे मालवाहतूकदार आणि खाजगी प्रवासी वाहनचालकांवर आर्थिक भार वाढणार आहे.
महामार्गांवरील सध्याचे आणि वाढणारे दर
सध्या राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर (एकेरी वाहतूक) पुढीलप्रमाणे आहेत:
• कार: ७५ रुपये
• टेम्पो: ११५ रुपये
• सहा टायर वाहन: २४५ रुपये
• दहा पेक्षा जास्त टायर वाहन: ३९५ रुपये
१ एप्रिलपासून या दरांत ५ ते १० रुपयांची वाढ अपेक्षित आहे.
टोल दरवाढीचे कारण
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या वाहतूक विभागाने महामार्गाच्या देखभालीसाठी, दुरुस्ती व इतर उपाययोजनांसाठी दरवर्षी टोल दरवाढ केली जाते. संबंधित महामार्गावरून होणारी वाहतूक, देखभाल खर्च, आणि अपेक्षित सुधारणा लक्षात घेऊन दर निश्चित केले जातात.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व इतर टोल रचना
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एकेरी टोल आकारणी केली जाते, तर काही महामार्गांवर २४ तासांत ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी रिटर्न टोलची सुविधा उपलब्ध आहे.
सध्याचे रिटर्न टोल दर पुढीलप्रमाणे आहेत:
• कार: ११० रुपये
• टेम्पो: १८० रुपये
• सहा टायर ट्रक: ३७० रुपये
• दहा टायरपेक्षा अधिक वाहन: ५९० रुपये
मुंबईतील टोल स्थिती
मुंबईतील सर्व टोलनाके खासगी कारसाठी टोलफ्री करण्यात आले आहेत. मात्र, अटल सेतूवरील वाहतूकसाठी टोल आकारणी सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील महामार्ग सध्या टोलमुक्त आहेत, परंतु मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर विविध ठिकाणी टोल नाके उभारण्यात येणार आहेत.
महामार्ग टोल वसुली सुरू होणारी ठिकाणे
मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुढील ठिकाणी टोल वसुली होणार आहे:
• खारपाडा
• सुकेळी खिंड
• पोलादपूर (चांढवे)
• चिपळूण (लवेल फाटा)
• रत्नागिरी ते सिंधुदुर्ग मार्गावरील विविध ठिकाणे
भाडेवाढीचा व्यापक परिणाम
एसटी प्रवासी भाडेवाढ, खाजगी रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ, आणि आता महामार्गावरील टोल दरवाढीमुळे सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत अनेकांना आर्थिक फटका बसणार आहे. या वाढीनंतर येणाऱ्या अर्थसंकल्पात नागरिकांना काही दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.