X : @NalavadeAnant
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेली इंडिया आघाडीची कालची सभा म्हणजे ज्यांना देशाच्या जनतेने आधीच नाकारले आहे, सत्तेतून हद्दपार केलेल्या तडीपार नेत्यांची सभा होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे गट आणि त्यांच्या इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांवर घणाणाती टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कालची इंडिया आघाडीची सभा म्हणजे केवळ एक फॅमिली गँदरिंग होती. धरून-बांधून आणलेले लोक या सभेमध्ये दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते, नैराश्याचे भाव स्पष्ट दिसत होते. एक विश्वास गमावलेला विरोधी पक्ष समोर दिसत होता. त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. कोणताही विकासाचा अजेंडा नाही, पंतप्रधानपदाचा उमेदवार देखील ते अजूनपर्यंत जाहीर करू शकले नाहीत. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे, त्यांचा द्वेष करणे हा एकमेव अजेंडा असल्याचे प्रत्येकाच्या भाषणातून दिसत होता. २०१४ पूर्वी याच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकीदार म्हणून हिणवले होते. मात्र आज देशाच्याच जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवल्याचा प्रहार मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर केला.
या सभेमधून एक नवीन गोष्ट घडली, ती म्हणजे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भाषणाची सुरुवात करताना ज्या प्रकारे ‘माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिनींनो आणि मातांनो’ या शब्दांनी भाषणाची सुरुवात करायचे, ते शब्द देखील उद्धव ठाकरे यांना आपल्या भाषणात गाळावे लागले. यावरून त्यांनी दिवंगत बाबासाहेबांच्या विचारांना आणि धोरणांना कायमची तिलांजली दिल्याचे दिसून आले. मात्र त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्हाला त्यांना सोडण्याचा विचार करावा लागला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या स्टालिन सारख्या लोकांसोबत एकाच मंचावर बसावे लागले, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत बाळासाहेबांची माफी मागायला हवी ”, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही, असं खुले आव्हान फारुक अब्दुल्ला यांनी याच मंचावरून दिले. त्याच फारुख यांच्या बाजूला हेच उद्धव ठाकरे बसले होते. त्यांनी सत्तेसाठी आपली भूमिका बदलली, पण आम्ही सत्तेसाठी भूमिका बदलणारे नाहीत. कारण शिवसेनेला एकेकाळी शत्रू मांडणारे आज काँग्रेस सोबतत आहेत. हे पॉलिटिकल क्रॉम्प्रमाईज होतं”,असा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.