नवी दिल्ली
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर इंडिया आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. उद्या दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते.
परिणामी उद्या होणारी इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील बैठक 18 डिसेंबरला होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
निवडणूक निकालांवर अपेक्षित होती चर्चा
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर इंडिया आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या निकालांवरील चर्चेसाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीतील २८ पक्षांच्या नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित केलं होतं. ६ डिसेंबर ही बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांना उपस्थित राहणं शक्य नसल्याने बैठकीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
आपल्याला बैठक आहे हेच माहिती नसल्याचे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कालच केले होते. तर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या पराभवाला कमलनाथ यांना दोषी धरले होते, कमलनाथ यांनी इंडिया आघाडीचा धर्म पाळला नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
वास्तविक काँग्रेसला तेलंगणासह मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये यश मिळेल अशी अपेक्षा होती. काँग्रेसने तेलंगणा जिंकले मात्र, राजस्थान सारखे मोठे आणि महत्वाचे राज्य गमावल्याने काँग्रेसमध्ये जशी अस्वस्थता आहे, तशीच ती इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांमध्येही आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.