गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात उतराव्यात – जयंत पाटील
सांगली : दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने महाराष्ट्रासोबत अनेक कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल, तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र, ही गुंतवणूक फक्त PR Activity ठरू नये,” असे ते म्हणाले.
जयंत पाटील यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की,
“मोठी बातमी! दावोसच्या परिषदेच्या पहिल्या दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी एकूण ५४ समंजस करार झाले असल्याच्या बातम्या येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगली बाब आहे, पण ती फक्त PR Activity ठरू नये.”
तसेच त्यांनी मागील वर्षीच्या गुंतवणुकींचा संदर्भ देत सरकारला प्रश्न विचारला.
“मागील वर्षी देखील अशाच प्रकारच्या घोषणा झाल्या होत्या. उदाहरणार्थ, ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसोबत २५ हजार कोटींचा करार, जिंदालसोबत ४१ हजार कोटींचा करार, तसेच हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचा करार झाला होता. मात्र, या करारांपैकी प्रत्यक्षात किती गुंतवणूक झाली हे राज्यकर्त्यांनाच ठाऊक आहे.”
यावर्षीही दावोस परिषदेच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी मोठ्या घोषणा झाल्या आहेत. मात्र, त्या फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात उतराव्यात, रोजगार निर्मिती व्हावी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना मिळावी, अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
सरकारच्या मोठ्या वल्गना आणि जनता बेदखल
दावोस परिषदेच्या माध्यमातून सरकारने गुंतवणुकीची मोठी यादी सादर केली आहे. मात्र, मागील अनुभव पाहता, या घोषणा प्रत्यक्षात येतील का, यावर शंका उपस्थित होत आहे. जयंत पाटील यांनी या पार्श्वभूमीवर सरकारला लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.