X : @therajkaran
मुंबई : आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) व सर्व महामानव समजून सांगणे गरजेचे आहे, शून्यातून विश्व निर्माण करणारे बाबासाहेब जर आजच्या पिढीला समजले तर ही पिढी आपल्या आयुष्यात यशाला नक्की गवसणी घालेल, त्यासाठी आजच्या प्रत्येक तरुणाने ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री व नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड (MP Prof Varsha Gaikwad) यांनी मुंबई येथे बोलताना व्यक्त केले. ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या १३ व्या आवृत्तीचे प्रकाशन खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या फक्त दीडशे दिवसांमध्ये 13 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या बेस्ट सेलर प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात (Columbia university, USA) प्रोफेसर असलेले डॉ. सुरज एंगडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे, तर पुढील तेराव्या आवृत्तीचे प्रकाशन आज शुक्रवारी मुंबईत खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस नेते सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, लेखक जगदीश ओहोळ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.