मुंबई: साप्ताहिक जीवन मार्गचे संपादक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव तसेच अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष व सीआयटीयुचे नेते डॉ. उदय नारकर यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या धमकीचा जीवन मार्ग संपादक मंडळाने तीव्र निषेध नोंदवत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखान्यात गेल्या काही दिवसांपासून ‘सीटू’च्या नेतृत्वाखाली कामगारांचे आंदोलन सुरू आहे. कामगारांच्या न्याय्य मागण्यांबाबत अलीकडेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. उदय नारकर, कामगार संघटनेचे पदाधिकारी, कारखाना चालवणारे मानसिंग खोराटे आणि कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली होती. या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना प्रशासनाला कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले होते.
या घडामोडींनंतर संतापाच्या भरात कारखाना मालक मानसिंग खोराटे यांनी काही गुंडांच्या माध्यमातून फोन करून डॉ. नारकर यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये गंभीर परिणामांचा इशारा देण्यात आला असल्याचेही समोर आले आहे. याशिवाय डॉ. नारकर यांच्या निवासस्थानाच्या परिसरात संशयित व्यक्ती फिरताना आढळल्याची माहिती मिळाली आहे.
कामगार, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या न्यायासाठी सतत लढा देणारे, तसेच लेखणीच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना समाजासमोर ठेवणारे डॉ. नारकर यांना धमकी देण्याचा प्रकार लोकशाहीविरोधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे संपादक मंडळाने म्हटले आहे. कारखाना मालक खोराटे आणि धमकी देणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
— साप्ताहिक ‘जीवन मार्ग’ संपादक मंडळ

