शिर्डी
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल आपल्या भाषणात राम शिकार करून खात होते, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यभरात भाजपकडून त्यांच्याविरोधात तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना माफी मागण्याची विनंती केली तर अनेकांनी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आज जितेंद्र आव्हाड यांनी आपण केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आणि मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर खेद व्यक्त करतो अशी भूमिका मांडली.
कधीही मी इतिहासाचा विपर्यास विकृतीकरण करीत नाही. काल मी बोललो ते ओघात बोललो. श्रीरामाबद्दल बोलताना ते मांसाहारी होते असं म्हटलं होतं. हा वाद मला वाढवायचा नाही. जे या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी काही संदर्भ देत आहे. असं म्हणत आव्हाडांनी राम मांसाहारी असल्याचे अनेक संदर्भ दिले.
१. वाल्मिकी रामायणात ६ कंद आहेत. त्यातील अयोध्या कंदातील सर्ग ५२ मध्ये श्लोक १०२ मध्ये याचा उल्लेख आहे.
२. १८९१ सालातील पुस्तक पश्मिम बंगाल मध्ये प्रकाशित झालं आहे. ममता नाथा दत्त याचे लेखक आहेत.
३. आयआयटीतील काही तरुणांनी त्या त्या काळात रामायणाचं वर्जन कसं केलंय त्याचं ट्रान्सलेशन केलं आहे.
-के एम के मूर्ती, गीता प्रेस, हरिप्रसाद शास्त्री यांनी या डॉक्युमेंटचं भाषांतर केलं आहे.
४. अन्नपुराण हा दाक्षिणात्य चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला असून यात दक्षिणेतील सुपरस्टार काम करत आहेत. यात त्यांनी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातील श्लोक हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजावून सांगितलाय..
यापुढे आव्हाड म्हणाले, मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलं नाही. मात्र आज काल अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे. त्यामुळे माझ्या कालच्या वक्तव्यावरुन कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.