X: @therajkaran
मुंबई : उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेनंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांची कानउघडणी केली आहे. सध्या प्रसारमाध्यमं ती घटना कोणत्या राज्यात घडली आणि तिथे कुणाचं सरकार आहे. यावरुन त्याला प्रसिद्धी देण्याचा निर्णय घेतात, असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केला.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये २८ फेब्रुवारी रोजी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाला होता. यामुळे व्यथित झालेल्या दोघींनीही आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता त्या दोघींपैकी एका मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले…
ही अतिशय दुर्दैवी बाब आहे की केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी राजकीय पक्षांचा वरदहस्त असलेली प्रसारमाध्यमेसुद्धा ठरवून रिपोर्टींग करत आहेत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यापासून ते सोनिया गांधीपर्यंत सर्वांना प्रश्न विचारण्यात आले होते. निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण देशाने एकमुखाने न्यायाची मागणी केली. पोलिस यंत्रणा, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमांनी यामध्ये त्यावेळी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावून पीडितेला न्याय मिळवून दिला.
आजघडिला असं दिसून येते की अशा घटनांवर भाष्य करण्याआधी प्रसारमाध्यमं ती घटना कोणत्या राज्यात घडली आहे आणि तिथे कुणाचं सरकार आहे, यावरून त्याला प्रसिद्धी देण्याचा निर्णय घेतात. भाजपशासित राज्यात घटना घडल्या तर प्रसारमाध्यमं त्याकडे ठरवून कानाडोळा करतात. उन्नाव, हाथरस पासून आत्ताच्या कानपूर पर्यंत – जिथे जिथे महिलांवर अत्याचार झाले तिथे त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. या जंगलराजमध्ये स्त्री असणे हा गुन्हा झाला आहे, कायदा नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे या मुलींच्या कुटुंबियांसोबत झालेल्या अन्यायाला प्रसारमाध्यमंसुद्धा जबाबदार आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही अतिशय शरमेची बाब आहे की महिलाा सन्मान आणि नारी शक्तीच्या बाता फक्त पोस्टरबाजीपुरत्या शिल्लक राहिल्या आहेत.
येणाऱ्या महिला दिनाच्या शुभेच्छा…