शिवसेना सचिव आमदार किरण पावसकर यांचा गौप्यस्फोट….!
X : @NalavadeAnant
मुंबई: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ज्या नाणार रिफायनरिला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सक्त विरोध करून तो प्रकल्पच रद्द केला, त्याच सरकारमधील शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तेथील जमिनी घेण्यासाठी त्यांच्या गुजराती आणि मारवाडी लोकांना प्रवृत्त तर केलेच पण त्यांच्या नावावर सातबारा करण्यासाठीही मदत केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेना सचिव आमदार किरण पावसकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
उद्धव ठाकरे यांनी नुकताच कोकणात जनसंवाद दौरा करत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर तुफान टीका केली. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये त्यांनी विद्यमान मंत्री उदय सामंत व दिपक केसरकर यांना लक्ष करत आरोपांची राळ उडवून दिली. त्या सर्वांचा समाचार घेण्यासाठी शिवसेना कार्यालयात आज सचिव व आमदार किरण पावसकर यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पावसकर यांनी यावेळी उध्दव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेचा, आरोपांचा त्यांच्याच टोकदार शैलीत खरपूस समाचार घेतला.
ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेताना पावसकर म्हणाले की, उध्दव यांनी आजपर्यंत कोकणातील जनतेचा फक्त आपल्या स्वार्थासाठीच वापर केला. त्यांनी तोंडावर सांगायचे एक व करायचे उलटेच अशी दुटप्पी भूमिका घेत कायम विश्वासघातच केला. कोकणामध्ये परप्रांतीय धनदांडग्यांना आणून जागा जमिनी द्यायच्या हे उद्योग कोणी केले ? आणि या उद्योगासाठी पैसा कोणी घेतला ? अशा प्रश्नांची सरबत्ती करतं, नाणारच्या रिफायनरीसाठी आम्ही लोकांबरोबर आणि नाणार नको म्हणून २५ किलोमीटर अंतरावर बारसूसाठी परवानगी द्यायची, त्याचा पुरावा मुख्यमंत्री म्हणून असताना दिलेले पत्रच सादर करीत पावसकर यांनी उध्दव ठाकरे यांना थेट लक्ष केले.
त्याचवेळी तुम्ही आजपर्यंत कोकणात जंगी भाषण करता त्याच कोकणच्या जनतेसाठी आपण मागच्या ३०-३५ वर्षात काय केले, असा परखड विचारणाही त्यांनी ठाकरे यांना केली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आजपर्यंत कोकणी जनतेने भरभरून प्रेम केले. पण उध्दव ठाकरेंच्या नशिबात ते नाही. तुम्ही दौऱ्यात जे काही बोललात ते लोकांना पटलं नाही, तिथली जनता चिडलेली आहे, असे सांगतानाच पावसकर यांनी ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेची तुलना ” दशावतारी कोकण दोरा” अशा शेलक्या शब्दांत केली.
पावसकर म्हणाले, ठाकरे यांनी पूर्ण कोकण दौऱ्यात फक्त अपशब्द, शिवीगाळ टोमणे टिका आणि आम्हाला शाप देण्याचे काम केले. ते कोकणात चौका चौकात दशा-अवतार कार्यक्रम करून आले आहेत. ज्या नेत्यांना कोकणात जाऊन तुम्ही शिव्या दिल्या ते सगळे तिथले सुपुत्र आहेत, तिथले लोक त्यांना मानणारे आहेत मग ते नारायण राणे असोत, निलेश व नितेश राणे असोत, मंत्री दीपक केसरकर तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकणच्या विकासासाठी मोठे व आवश्यक निर्णय घेतले म्हणून ते तिकडून निवडून येतात. म्हणूनच कोकणी जनता त्यांना भरभरून मते देऊन जिंकून आणतात, अशा शब्दात त्यांनी पुन्हा एकदा उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे शिवसैनिक घडवले त्या प्रत्येक शिवसैनिकाला ही व्यक्ती शिव्या घालते, असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. दुसऱ्याच्या कर्तुत्वावर बोलता, आधी तुम्ही तुमच्या कर्तुत्वावर बोला, असे आवाहन देत पावसकर पुढे म्हणाले की, राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी आम्हाला निमंत्रण मिळालं नाही म्हणून मीडियासमोर सांगण्यात आलं, चार पाच दिवस बातमीही चालवण्यात आली.
एकीकडे नाराजी दाखवायची मात्र दुसरीकडे भाजप बरोबर आम्ही पण जुळवून घेऊन काम करायला तयार आहोत अशा पद्धतीच्या बोलण्यासाठी तुमची माणसं दिल्लीला पाठवायची, म्हणजे मागच्या दरवाजाने कसे यायचे हेच ते ठरवत आहेत. मागेही मुख्यमंत्री होताना मला मंत्रिपद नको, मुख्यमंत्री नको, काहीच नको, असं म्हणायचं आणि मुख्यमंत्री व्हायचं, मुख्यमंत्री होण्यासाठी मला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद द्या, हे पण यांनीच मागायचं, ते नाही दिले म्हणून दुसऱ्याबरोबर जायचं तसेच भाजपाच्या विरोधात, पंतप्रधानांच्या विरोधात, मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात एकेरी भाषेत बोलायचं आणि दिल्लीला मात्र आपली माणसं पाठवायचे की जी त्यांच्याकडे बोलतात की आम्ही पुन्हा भाजपा बरोबर जुळवून घ्यायला तयार आहोत, हे खरं आहे की खोटं आहे? हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे, असेही खुले आव्हानच यावेळी पावसकर यांनी उध्दव ठाकरे यांना दिले.
आता फक्तं सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सलियान प्रकरणात केंद्रातील सीबीआयने सखोल चौकशी करून जनतेला सांगावे की, ती आत्महत्या होती की हत्या? अशी आमची मागणीच असून किमान यानिमीत्ताने तरी खोटे बोलणारे जगासमोर उघडे पडतील, असा थेट इशाराही शिवसेना प्रवक्ते पावसकर यांनी दिला.