पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते, वडगाव मावळ येथील प्रांगणात “क्रीडारंभ २०२५” या तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवाचा यशस्वी समारोप करण्यात आला.
क्रीडारंभचे उद्घाटन क्रिकेटपटू रोहित मोटवानी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी पीसीयूच्या कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, क्रीडा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रोतिभा नाथ बॅनर्जी, डॉ. अमित पाटील, डॉ. वी. एन. पाटील, डॉ. रामदास बिरादार, मकबूल खान, डॉ. अंजू बाला, डॉ. राजकमल उपाध्याय आदींसह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी या सांघिक खेळांबरोबरच कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस या वैयक्तिक स्पर्धा देखील घेण्यात आल्या. या मध्ये दीड हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यशस्वी विद्यार्थ्यांना व संघांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कौस्तुभ भोसले या विद्यार्थ्याने दिल्ली येथे झालेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
“क्रीडारंभ २०२५” चे आयोजन कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.