नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या 19व्या हप्त्याचे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन वितरण झाले. या राज्यस्तरीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनामती, नागपूर येथून उपस्थित होते. यावेळी त्यांनी पिक स्पर्धेतील सहभागी शेतकरी तसेच प्रगतीशील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उद्योजकांचा सत्कार केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वार्षिक ₹6,000 अनुदानात आणखी ₹3,000 ची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आता वार्षिक ₹15,000 आर्थिक मदत मिळेल. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पूर्वीच्या कार्यकाळात विदर्भातील बळीराजा संवर्धन योजनेंतर्गत ₹25,000 कोटींच्या 89 प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केली असल्याचे सांगितले. तसेच ‘स्व. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना’ अंतर्गत मराठवाडा आणि विदर्भातील जलसंवर्धन आणि विकासकामांसाठी पहिल्या टप्प्यात ₹4,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून आणखी ₹6,000 कोटींची कामे सुरू आहेत.
राज्यातील जलसंधारणाच्या 150 योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, वैनगंगा-नळगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 10 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. राज्य शासनाच्या ‘स्मार्ट’ योजना आणि ‘ॲग्री स्टॅक’ योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला अधिक बळकटी दिली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी विभागाचे अभिनंदन केले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.