मुंबई – राज्य मंत्रिमंडळाने पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. मागील महिन्यात बारामती येथे आयोजित ‘कृषिक-2025’ प्रदर्शनात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली होती. केवळ महिनाभरातच हा निर्णय अमलात आणण्यात आला आहे.
पशुपालनाला मोठी चालना
या नवीन महाविद्यालयांमुळे पशुपालकांना आधुनिक पशुवैद्यकीय सुविधा मिळणार असून प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढेल. कऱ्हावागज (बारामती) येथे 82 एकर आणि लोणी (परळी) येथे 75 एकर जागेवर ही महाविद्यालये उभारली जाणार आहेत.
1129 कोटींची आर्थिक तरतूद
या प्रकल्पांसाठी राज्य सरकारने 1129.16 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, प्रत्येक महाविद्यालयासाठी 564.58 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती
प्रत्येक महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर मिळून 234 नियमित आणि 42 मानधनावरच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील कृषिपूरक व्यवसायांना चालना
या निर्णयामुळे पशुपालकांना सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, पशुसंवर्धनाला मदत होईल आणि कृषिपूरक व्यवसायांना चालना मिळेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेगवान निर्णय प्रक्रियेमुळे अवघ्या महिन्याभरातच या महाविद्यालयांना मंजुरी मिळाल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.