नवी दिल्ली : लडाखचे सामाजिक कार्यकर्ता, पर्यावरणतज्ज्ञ, शिक्षण सुधारक सोनम वांगचुक गेल्या 16 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत.वांगचुक यांच्या उपोषणामागील कारणं काय आहेत? 21 मार्च 2024 वांगचुक यांच्या उपोषणाचा 16 वा दिवस आहे. वांगचुक गेल्या 16 दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या आमरण उपोषणाबद्दल सकाळी आणि रात्रीच्या वेळेत माहिती देत आहेत. वांगचुक यांनी आपल्या उपोषणाचं नाव क्लायमेट फास्ट म्हणजेच पर्यायवरणासाठी उपोषण असं ठेवलं आहे. उपोषणाच्या 16 व्या दिवशी त्यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, आज मी पर्यावरण उपोषणाच्या 16व्या दिवसाला सुरुवात करीत आहे. मी केवळ मीठ आणि पाण्यावर जिवंत आहे. मात्र आता याचा परिणाम माझ्या शरीरावर दिसू लागला आहे. वांगचुक पुढे म्हणाले, एनर्जी कमी होत असल्याचं जाणवत आहे. बाहेर खूप थंडी आहे. काल तर तापमान उणे 8 डिग्रीपर्यंत उतरलं होतं. माझ्यासोबत तब्बल 120 जणं रात्रीच्या वेळी बाहेर थंडीत झोपतात.
लडाखमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक 6 मार्चपासून उपोषण करीत आहेत.काय आहेत त्यांच्या मागण्या?
- लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि राज्यघटनेतील सहावे परिशिष्ठ लागू करावे.
- लडाखमध्ये आणखी एक संसदीय जागा वाढवणे
- लडाखमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना
लडाखच्या सीमा या चीनशी जोडलेल्या असल्याने भारतासाठी हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. आधी हा प्रदेश जम्मू-काश्मिर राज्याचा भाग होता. परंतू 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्राने राज्यघटनेतील कलम 370 रद्द करून घेतलं आणि जम्मू-काश्मीर राज्याचं द्विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. लडाखला स्वतंत्र अस्तित्व मिळालं असलं तर जम्मू-काश्मीरचा भाग म्हणून त्यांना मिळालेला विशेष दर्जा संपुष्टात आला.
त्यावेळी सरकारने काही आश्वासने दिली होती, मात्र साडेचार वर्षात ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे येथील लोक रस्त्यावर उतरले आहेत.
नाराजीचं कारण काय?
लडाख केंद्रशासित प्रदेश आहे, मात्र येथे कुठलं विधिमंडळ नाही. 370 कलम रद्द होण्यापूर्वी लडाखमधून जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत चार आणि विधान परिषदेत दोन प्रतिनिधी निवडून येत होते. मात्र 2019 नंतर तिथे नायब राज्यपाल म्हणून ब्रिगेडियर डॉ. मिश्रा यांची नेमणूक केली. आणि सध्या तिथला कारभार केंद्राने नेमलेले इतर प्रशासकीय अधिकारी चालवतात.