X: @ajaaysaroj
राज ठाकरे आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या हाय प्रोफाइल दिल्ली बैठकीला आता जवळपास ७२ तास उलटून गेले आहेत. महायुतीमधील (Mahayuti) डब्यांना आता मनसेचे इंजिन लागणार अशी चर्चा देशभर सुरू आहे. याच बैठकीचा पुढचा अध्याय म्हणून आज मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील ताज मध्ये झालेल्या जवळपास अडीच तासांची मॅरेथॉन बैठकीकडे बघितले जात आहे. मात्र एवढे सगळं होऊनही मनसेला महायुतीमध्ये अधिकृतपणे एन्ट्री घ्यायला मुहूर्त सापडत नाहीये असे एकंदरीत चित्र आहे.
असे बोलले जात आहे की, भाजपने (BJP) स्वतःच्या कोट्यातील जागा मनसेला (MNS) देण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. मनसेला देण्यात येणाऱ्या जागा शिवसेनेने (Shinde Sena) सोडाव्यात असा प्रस्ताव भाजपने शिवसेनेसमोर ठेवला आहे. तर लढवण्यात येणाऱ्या जागा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवाव्यात, असा प्रस्ताव मनसेला देण्यात आला असल्याची चर्चा आहे. मुळातच शिवसेनेला त्यांना अपेक्षित असलेल्या सर्वच जागा मिळतील याची खात्री नाही. त्यामुळे निर्माण होणारी नाराजी शमविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना पराकाष्ठा करावी लागत आहे. आता त्यात मिळणाऱ्या जागांमधूनच जर एक दोन जागा मनसेला सोडव्या लागल्या तर नाराजी आणखी वाढण्याची भीती शिंदे यांना सतावत आहे. पण राज ठाकरे महायुतीच्या वळचणीला येणे यात भाजप बरोबरच शिवसेनेचा फायदा तर आहेच पण वैयक्तिक बेरजेच्या राजकारणाचा विचार केल्यास कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तिथलेही गणित आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेचा मोठा मतदार आहे. कल्याण ग्रामिण मध्ये तर राजू पाटील (MNS MLA Raju Patil) हे मनसेचे आमदार आहेत. मनसेच्या मतदानाचा फायदा या संपुर्ण लोकसभा मतदार संघातील सर्व सहा विधानसभा मतदार संघात डॉ शिंदे यांना होणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे दाखवलेली नाराजी ही कल्याण लोकसभा मतदारसंघात एवढ्या पराकोटीला पोहचली होती की थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan) यांना डॉ शिंदे यांच्या उपस्थितीत एक मेळावा घेऊन भाजप कार्यकर्त्यांना जाहीर समज द्यावी लागली. त्यामुळे राजू पाटील महायुतीच्या बरोबर असणे हे या मतदारसंघात डॉ शिंदेंच्या पथ्यावरच पडणार आहे. शिवाय क्राऊड पुलर स्टार प्रचारक राज ठाकरे यांचा फायदा महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे ते वेगळेच. हीच बाब चाणाक्ष राज ठाकरे यांनी ओळखली असल्याने महायुतीच्या बैठकांमध्ये राज यांनी केवळ लोकसभा नाही तर पुढे येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबत देखील काही कमिटमेंटस महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मागितल्या आहेत.
मनसेच्या संभाव्य एंट्रीमुळे महायुतीच्या (Mahayuti) उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करण्यास भाजप व शिवसेना या दोन पक्षांना उशीर होत असला तरी, राज ठाकरे यांना काही त्या गोष्टींची जास्त काळजी करण्याचे कारण नाही. अठराव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वाटचालीत राज ठाकरे हे चांगलेच तावून सुलाखून तयार झालेले पॉलिटिकली करेक्ट नेते आहेत. आपल्या पक्षाची वाटचाल आता एका नवीन वळणावर नेत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे हे प्रत्येक पाऊल जपून आणि अत्यंत विचारपूर्वक टाकत आहेत. त्यामुळे पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या निर्णयासाठी स्वाभाविकपणे राज ठाकरे हे अपेक्षित वेळ घेत आहेत. येणाऱ्या काही काळातच मनसेचे इंजिन कुठल्या रुळावर धावेल हे महाराष्ट्राला समजणार आहे.