X: @therajkaran
लोकसभेसाठी सांगली (Sangli) मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे यांचे जागेबाबत रस्सीखेच सुरू असतानाचं आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)
सांगलीतून रणशिंग फुकले आहे. अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लागून राहिलेल्या सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे सांगलीच्या आखाड्यात पैलवान चंद्रहारच लढणार, चंद्रहार जिंकणार आणि हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र डबल केसरीच त्याच्या विजयाची गदा घेऊन एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत गेल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकार क्षेत्रातील एक उत्तम नेतृत्व वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली वाहून अभिवादन केले. काँग्रेसमधून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) प्रमुख दावेदार असताना शिवसेना ठाकरे गटाकडून सांगली जागेवर दावा करत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात तणाव निर्माण झाला. मात्र स्वागतासाठी आलेल्या वसंतदादा घराण्यातील शैलजाभाभी पाटील यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत आम्ही सर्वजण सोबत, चांगल्या पद्धतीने जाऊ, काही काळजी करू नका, असा विश्वास व्यक्त केला.
त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, डबल इंजिन डबल आता सांगलीमध्ये फेल होणार असून ज्या विराट संख्येने इथं जमला आहात ते पाहून मला क्षणभर वाटलं की कुस्तीची दंगल सुरू आहे. कारण सांगली, कोल्हापूरला एवढी गर्दी कुस्तीलाच होते, पण माननीय उद्धवजी आले ते खास पैलवान चंद्रहारसाठी आले. ते पुढे म्हणाले की, आजची सभा होणार नाही, होणार नाही, असे म्हणत होते. पण सभा झाली. सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत आणि पुढील सभेला सगळे व्यासपीठावर सर्व नेते उपस्थित राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.