महाराष्ट्र ताज्या बातम्या

Loan Waiver: कर्जमाफीचे संकेत : मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत (Loan waiver to farmers) सकारात्मक संकेत मिळत असल्याने मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जमाफीचा निर्णय झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे चित्र आहे. कारण मागील महिन्यातच मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या (76 farmers committed suicide in Marathwada) केल्याची नोंद शासन दप्तरी आहे.

कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, त्यातूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा कयास शेतकरी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असताना राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Dada Patil) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक विधान केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही कर्जमाफीच्या मुद्द्यावर सकारात्मक असून, यासाठी आवश्यक असलेला संपूर्ण कर्जविषयक डाटा गोळा करण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. मात्र कोरडवाहू पिकांसाठी होणारा खर्च, लागवड व मजुरीचा वाढता भार आणि अपेक्षित उत्पादन न मिळणे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेती पूर्णतः बेभरवशाची झाली आहे.

मागील महिन्यात मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०, नांदेडमध्ये ११, जालना जिल्ह्यात सहा, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी पाच, लातूर जिल्ह्यात तीन तर परभणी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

महागडी बियाणे, वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतीमालाला अपेक्षित दर न मिळणे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित दरवर्षी कोलमडत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय महत्त्वाचा ठरेल, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

शासनस्तरावर सध्या शेतकऱ्यांकडे असलेल्या कर्जाची एकूण रक्कम, कर्जमाफीचे निकष आणि त्याचा आर्थिक भार याबाबत अभ्यास सुरू आहे. निवडणुकांच्या काळात विविध राजकीय पक्षांनी कर्जमाफीची आश्वासने दिली असल्याने, कर्जमाफी करणे हे राजकीय पक्षांचे कर्तव्य असल्याचे मत अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना जाहीर सभांमध्ये याबाबत वारंवार जाब विचारण्यात आला आहे.

राज्यात ‘लाडकी बहीण’ योजना राबविण्यात आली असताना, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठीही ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठवाड्यातून होत आहे. तुळजापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सकारात्मक संकेतांमुळे शेतकरी वर्गात आशा निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  राज्याचा अर्थसंकल्प (CM Devendra Fadnavis will present budget) मांडणार आहेत. त्याआधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.

आर्थिक विवंचनेतून बेकायदेशीर पिकांकडे वळण्याचे प्रकार

मराठवाड्यातील काही गावांमध्ये अलीकडे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. बीड आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या अफूची लागवड केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका गावात शिरळी शेतशिवारात प्रताप सुरेश नलगे (वय ४२) यांनी लसणाच्या पिकामध्ये चार गुंठ्यांत अफूची लागवड केल्याचे आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून अफूची झाडे, बोंडे व फुले जप्त केली. राजपत्रित अधिकारी व पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या अफूच्या झाडांचे वजन एक क्विंटल ७७ किलो ४५ ग्रॅम असून, त्याची अंदाजे बाजार किंमत तीन लाख ५४ हजार ९०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. फॉरेन्सिक लॅब पथकाच्या मदतीने मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandage) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात