मुंबई
येत्या काही दिवसा लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्यापही कोण किती आणि कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवणार याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. अद्यापही दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा सुरूच आहे. एकीकडे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर सामील होतील की नाही याचा निर्णय झाला नसला तरी महायुतीचा लोकसभा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात आहे. यात अजित पवार गटाला सर्वात कमी जागा असल्याचं दिसत आहे.
येत्या लोकसभेत महायुतीतून भाजप ४८ पैकी ३२ जागांवर निवडणूक लढवू शकतो, तर शिंदे गटाला १० जागा मिळण्याची शक्यता आहे. यात अजित पवार गटाला उरलेल्या ६ जागा मिळू शकतात, असा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. सध्या अजित पवार गटाकडे लोकसभेसाठी फारसे उमेदवार नाहीत. त्यात छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुमित्रा पवार हे लोकसभा निवडणूक लढवू शकतात. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. अजित पवार गटाचं मुख्य लक्ष हे विधानसभा असणार असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे लोकसभेत ते फार जागा लढवतील, ही शक्यता कमीच आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे अनेक उमेदवार कमळावर निवडणूक लढवण्याची शक्यता शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.
आता लोकसभेत कोणाला किती जागा मिळतात आणि कोण किती जागा जिंकतं, हे काही महिन्यात स्पष्ट होईल.