मुंबई
दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक इकॉनॉमिक फोरममध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक एमओयू करतील. एकाही रुपयाचा अपव्यय तिथे होणार नाही आणि या फोरममध्ये महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये ऐतिहासिक ठसा उमटवेल याचा मला महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून पूर्ण विश्वास आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
उदय सामंत पुढे म्हणाले की, दावोसचा दौरा ऐतिहासिक दौरा ठरणार आहे. या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून एमआयडीसीचे १४ लोकांचे, एमएमआरडीएचे ५ लोकांचे शिष्टमंडळ जाणार आहे आणि बाकी उर्वरित शिष्टमंडळे तिथे आधीच पोहचले आहेत. तसेच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडावा याची दक्षता घेण्यासाठी ३ लोकांचे शिष्टमंडळ तिथे स्वखर्चाने पोहचलेले आहे. पण यावर सुद्धा विरोधक आक्षेप घेत आहेत. आमच्याकडे हिशोब मागत आहेत. ज्यांनी कधी जनतेसाठी आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे काढले नाहीत. त्यांना या गोष्टीचे अप्रूप वाटणे साहजिक आहे, कदाचित म्हणून ते आक्षेप घेत आहेत. आम्हाला इंडस्ट्री कशी वाढवावी किती लोकांचे शिष्टमंडळ असायला हवे मार्गदर्शन द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण माझा त्यांना स्पष्ट शब्दात सांगणे आहे की ज्या लोकांनी भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपतीच्या घराखाली स्फोटके ठेवली, त्यांनी इंडस्ट्री कशी वाढवावी, किती लोकांचे शिष्टमंडळ घेऊन जावे यावर आम्हाला मार्गदर्शन देऊ नये, असा सणसणीत टोला उदय सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.
ते पुढे म्हणाले की, माझे सर्व विरोधकांना सांगणे आहे की, जे आम्हाला हिशोब विचारत आहेत त्यांनी २१ तारखेपर्यंत थांबावे. आम्ही त्यानंतर खर्च झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब आम्ही जनतेला देऊ असा मी शब्द देत आहे. मग जनतेला आणि विरोधकांना सुद्धा हे कळेल की, शिष्टमंडळ कितीही मोठे असले तरी यावेळचा दावोसचा दौरा हा पैशाचा कुठेही अपव्यय न होता कमी पैशात झालेला आहे. मागील वर्षी झालेल्या इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही १,३७,००० कोटींचे एमओयू आम्ही केले होते. त्यातील ८३% एमोयूंची अंमलबजावणी झालेली आहे आणि यावर्षी आम्ही तो रेकॉर्ड सुद्धा तोडणार आहोत.
वेदांत फॉक्सकॉन हा उद्योग आमच्यामुळे महाराष्ट्राबाहेर गेला हा तथ्यहीन आरोप विरोधकांनी आमच्यावर केले. पण महाराष्ट्राची बाहेरून आणण्याची ताकद किती मोठी आहे, हे दौऱ्यातून सिद्ध होईल. विरोधकांनी सुद्धा जनतेची दिशाभूल न करता २१ तारखेपर्यंत थांबावे आणि महाराष्टाच्या उद्धारासाठी आणि युवा पिढीला रोजगार देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे प्रयत्न करत आहेत, ते अतिशय मोठे आहेत, त्या प्रयत्नांना सर्वानी समर्थन करावे ही माझी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून प्रामाणिक भावना आहे.