मुंबई
आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. आज या प्रकरणात उद्धव ठाकरे महापरिषद घेणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विधिज्ञ, राजकीय विश्लेषक देखील सहभागी होणार आहेत.
मुंबईतील वरळी एनएससीआय डोम इथं सायंकाळी ४ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: ही पत्रकार परिषद संबोधित करतील. त्यांच्यासह कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा ऊहापोह
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालातील ठळक व महत्त्वाच्या त्रुटी यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल कशा पद्धतीने चुकीचा आहे, यातील दुर्लक्षित मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाणार आहे.
सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जाणार – संजय राऊत
देशातील कोणत्याही पत्रकारानं या आणि प्रश्न विचारा, सर्व प्रश्नांची उत्तरं आज दिली जाती, असं संजय राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी १० वर्षात एकतरी पत्रकार परिषद घेतली का? त्यामुळे आमच्या पत्रकार परिषदेवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही, आमच्यात जनतेच्या प्रश्नांचा सामना करण्याची हिंमत आहे, तुमच्यात आहे का? अशा शब्दात राऊतांनी घणाघात केला.