मुंबई
राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय ‘ निर्धार नारी शक्तीचा’ या घोषवाक्याखालील राज्यस्तरीय मेळावा शुक्रवार दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिली.
या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादीचे राज्यातील सर्व मंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिलाच राज्यस्तरीय महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी राज्यभरातून महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहितीही प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दिली.
या मेळाव्याच्या माध्यमातून नारी शक्तीचा जागर होणार असून, विविध सामाजिक संस्कृती आणि परंपरेचा इतिहास समोर आणला जाणार आहे. राज्यातील आदिवासी समाजातील महिल्या आपापल्या पारंपारिक वेशभुषेत या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने महाराष्ट्रातील महिला संस्कृती आणि परंपरेचा इतिहासच जागा होणार आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील एकमेव महिला मंत्री असलेल्या अदितीताई तटकरे यांनी महिला सक्षमीकरणाबाबत ‘लेक माझी लाडकी’ या महत्वाकांक्षी योजनेचा निर्णय घेतला आहे. यासोबतच राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचा मसुदा तयार करत लवकरच त्याची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला सबलीकरणाबाबतची भूमिका आणि धोरणाची मांडणी करणार आहेत.
नव्या गाण्याची उत्सुकता…
दरम्यान ‘निर्धार नारी शक्ती’ या मेळाव्याचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन गाण्याचे अनावरण होणार आहे. सुप्रसिध्द गायक अवधुत गुप्ते यांच्या आवाजाचा साज असलेल्या या नवीन गाण्याची उत्सुकता असून, यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असेही रूपालीताई चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.