मुंबई : आज महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिग्गज नेते निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहे. अर्ज दाखल करताना दोन्ही बाजूकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
महाविकास आघाडीकडून आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. अमोल कोल्हे, पुण्यातून रवींद्र धंगेकर हे तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे सुनेत्रा पवार बारामतीतून अर्ज दाखल करतील. याशिवाय महायुतीचे उदयनराजे साताऱ्यातून, रायगडमधून सुनील तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उदयनराजेंचं मोठं शक्तिप्रदर्शन…
सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्यानंतर आज साताऱ्यातून उदयनराजे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्सन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी ११ वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावरुन रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे पुण्यातील कौन्सिल हॉलमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत. रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करतील.