मुंबई
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील एक मतदारसंघ मिळावा यासाठी शरद पवार आग्रही राहिल्याची चर्चा आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील रावेर आणि जळगाव दोन्ही मतदारसंघ हवे असतील तर मुंबईच्या जागेवर त्यांना पाणी सोडावं लागणार अशी चिन्हं आहेत.
दुसरीकडे शरद पवार नाशिक, दिंडोरी या जागांसाठीही इच्छूक आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव बाबुराव देवकर २,९९,२४० मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते. तर भाजपचे उन्मेश पाटील ७,०९,५१० मतं घेऊन विजयी झाले होते.
तर दुसरीकडे रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. २०१९ च्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे भाजपमधून ६,५२,२१२ मतांनी विजयी झाल्या होत्या. २०१४ मध्येही रक्षा खडसे विजयी झाल्या होत्या. तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनिश दादा जैन यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ…
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवरुन भाजपचे मनोज कोटक विजयी (५७.४ टक्के) ठरले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर संजय दिना पाटील यांना ३२.१४ टक्के मतदान झालं होतं. संजय दिना पाटील हे ठाकरे गटातून ईशान्य मुंबई या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. दुसरीकडे या मतदारसंघातून निवडणूक लढवता येईल, असा मोठा चेहरा शरद पवारांकडे नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जागांसाठी शरद पवार मुंबईतील जागेवर पाणी सोडू शकतात.