नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथ सिंहसह तब्बल १५५ जणांच्या नावाचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी, अमित शाहांना गांधीनगर, राजनाथ सिंहना लखनऊ, स्मृती इराणी अमेठी, धर्मेंद्र प्रधान यांना ओडिसातील संबलपूर, ज्योतिरादित्य शिंदे यांना ग्वाल्हेरच्या गुना-शिवपुरी, शिवराज सिंह चौहान यांना भोपाल किंवा विदिशा आणि संबित पात्रा यांना ओडिसातील पुरीमधून तिकिट दिलं जाऊ शकतं.
याशिवाय भिवानी बल्लभगढातून भूपेंद्र यादव, डिब्रुगढातून सर्बानंद सोनोवाल, राजौरी-अनंतनागमधून रविंद्र रैना, कोटातून ओम बिरला, नॉर्थ-इस्ट दिल्लीतून मनोज तिवारी, पश्चिम दिल्लीतून परवेश वर्मा आणि आसनसोलमधून भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंह यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं.
दिल्लीत गुरुवारी २९ फेब्रुवारी भाजप मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. यावेळी रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ३.१५ वाजेपर्यंत १७ राज्यांतील १५५ लोकसभा जागांवर चर्चा झाली. तब्बल ४ तास सुरू असलेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्याशिवाय भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.