Twitter : @NalavadeAnant
मुंबई
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही ट्रिपल इंजिन सरकार दुष्काळ जाहीर करण्याची धमक का दाखवत नाहीत, असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जात असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं १९५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, हे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात ३५८ पैकी १९४ तालुके दुष्काळाच्या छायेत असून १६ जिल्ह्यांमध्ये ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक प्रभावित भागात पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग (मध्य महाराष्ट्र) आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे. सध्या मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीत गतवर्षीच्या ९६.७५ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ ३४.५२ टक्के पाणीसाठा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनीमध्ये गेल्या वर्षीच्या १०० टक्क्यांच्या तुलनेत केवळ २३. ६५ टक्के पाणीसाठा आहे.
ते म्हणाले, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक महसूल विभागातील धरणांमध्ये ६८.१२ टक्के, औरंगाबाद विभागात ३२.४५ टक्के आणि पुणे विभागात ७२.८७ टक्के पाणीसाठा आहे. बळीराजा अडचणीत आला असून महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे पडलेलं नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही, कर्जाचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही. मग, महाराष्ट्र सरकार झोपलंय का ? असा सवाल करत वडेट्टीवार म्हणाले की, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून थापा मारणारे मुख्यमंत्री निष्क्रिय आहेत. अर्धे उपमुख्यमंत्री राजस्थान निवडणूक प्रचारात व्यस्त आहे आणि अर्धे उपमुख्यमंत्री त्यांच्या अखत्यारीत न येणाऱ्या खात्यांच्या बैठका घेऊन स्वतःच्या आमदारांसाठी निधी पळवण्यात व्यस्त आहे. हे सरकार स्वतःच्या कामात मश्गूल आहेत. दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना त्याच्याकडे या सुस्त सरकारचं लक्ष कधी जाणार? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.