Twitter : @MilindMane70
महाड
रायगड जिल्ह्यातील महाड शहर हे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीत कोणत्याही बेकायदेशीर व अवैध धंद्यांना मोकळीक दिली जाऊ नये, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार हे धंदे काही काळ बंद ठेवण्यात आले होते. परंतु सध्या पुन्हा मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, व्हिडिओ गेम यांसारखे तत्सम बेकायदेशीर व अवैध धंदे सुरू झाले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून महाड शहरतर्फे महाड शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून या ऐतिहासिक महाड शहरात हे बेकायदेशीर धंदे ताबडतोब बंद करण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली आहे.
मनसेचे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी हे निवेदन महाड शहर पोलीस ठाण्यात दिले असून हे अवैध धंदे कोणाच्या राजकीय वरदहस्ताने सुरू आहेत? असा सवाल विचारत महाडच्या लोकप्रतिनिधींवर देखील घणाघाती आरोप केला आहे. पंकज उमासरे यांनी अवैध मटके धंद्याविरोधात पोलखोल केली असून एका व्हिडिओद्वारे त्यांनी गंगाधरच आहे शक्तिमान, हा नक्की गंगाधर कोण? असा सवाल केल्याने महाडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला व्हिडिओ गेम नक्की कोणाचा? या चौकात चालणारा जुगार नेमका कोणाचा? शहरातील वासंती बारच्यावर असलेला क्लब कोणाचा? मध्यमा ट्रायसिटी मध्ये चालणारा व्हिडिओ गेम कोणाचा? असा सवाल त्यांनी सत्ताधारी गटाला विचारला आहे.
महाडमधील बिरवाडी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांगलवाडी फाटा जुगाराचा अड्डा बनला असून बिरवाडी शहर हे जुगाराच्या अड्ड्याचे माहेरघर बनले आहे. येथील व्हिडिओ गेम तिकडे कोणी नेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जुगार, मटका, व्हिडिओ गेमला सरकार मान्यता नसताना त्यांना चालण्यासाठी कोण अभय देते? असा सवाल त्यांनी केला आहे.
अवैधरित्या चालणाऱ्या जुगार धंद्यावरील लोकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी ते धंदे चालू केले आहेत का? असा सवाल करून मनसेचे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाड तालुक्यातील अनेकांचे संसार उध्वस्त होण्यापासून थांबणार का? सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार काय? या ऑनलाइन गेम आणि मटका जुगार यातून महाडकारांची सुटका होणार का ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे महाडकारांना देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
पंकज उमासरे यांनी केलेल्या व्हायरल व्हिडिओ क्लिपमुळे महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सत्ताधारी गटातील लोकच अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याची चर्चा महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात आहे. आता प्रशासन नेमकी मटके, जुगार व व्हिडिओ गेम चालकांची बाजू घेते की सर्वसामान्य नागरिकांना न्याय देते? हे येणाऱ्या काळात उघडकीस होणार असल्याने अवैध धंदा करणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.