मुंबई: भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) हस्तांतरित करण्यात आली आहे. लवकरच ही युद्धनौका देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणली जाईल, शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केली जाईल आणि नंतर समुद्रात बुडवली जाईल. यामुळे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगद्वारे अथवा पाणबुड्यांच्या माध्यमातून समुद्राखालील या युद्धनौकेचे दर्शन घेता येईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी गनिमी काव्यासाठी मोक्याचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या विजयदुर्ग खाडीत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. विजयदुर्ग किल्ला मराठ्यांच्या अधिसत्यात तब्बल 105 वर्षे होता. येथे महाराजांनी आरमारासाठी सुरक्षित वाघवटं खाडी निवडली होती. ही खाडी सुमारे 42 किमी लांब आणि 40-50 मीटर खोल आहे. या प्रकल्पामुळे विजयदुर्गच्या ऐतिहासिक ठिकाणाला पर्यटन केंद्र म्हणून नवे महत्त्व मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयासोबत विशेष पाठपुरावा करून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले आहेत. पर्यटनविकास मंत्री शंभुराजे देसाई, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे.
’आयएनएस गुलदार’ची गौरवशाली सेवा
चार दशकांच्या गौरवशाली सेवेनंतर 12 जानेवारी रोजी ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका नौदलातून कार्यमुक्त करण्यात आली. आपल्या सेवा काळात या जहाजाने सागरी सुरक्षा मोहिमा, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही युद्धनौका पूर्वी भारतीय नौदलाच्या अंदमान-निकोबार कमांडच्या ताब्यात होती. आता ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे विजयदुर्ग परिसरात अधिकाधिक पर्यटक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 23 राज्यांमधील 40 पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देत त्यासाठी निधी जाहीर केला होता. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्टिफिशियल रीफ आणि अंडरवॉटर म्युझियमचाही समावेश आहे. MTDC पर्यटकांसाठी तीन ते चार पाणबुड्या (submarines) विकत घेणार आहे, जेणेकरून स्कुबा डायव्हिंगची भीती असलेल्यांनाही युद्धनौकेचे दर्शन घेता येईल.
विजयदुर्ग परिसर का निवडला?
1. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी साम्राज्य : कल्याण येथे आरमार बांधणीचा कारखाना उभारण्यात आला होता. येथे महाकाय गलबते, पडाव, पालव, गुराब, मचवा अशा प्रकारच्या युद्धनौका बांधल्या जात होत्या.
२. सागरी सुरक्षेसाठी योग्य स्थान : नागमोडी वळण असलेल्या वाघवटं खाडीमुळे ती वादळ-वाऱ्यांपासून नौकांसाठी सुरक्षित होती. आरमारी गनिमी काव्यासाठीही हे ठिकाण मोक्याचे मानले जात असे.
३. पर्यटन आणि जैवविविधता संवर्धन : ही युद्धनौका समुद्रात कृत्रिम प्रवाळ भिंत (Artificial Reef) निर्माण करेल. यामुळे समुद्री पर्यावरण समृद्ध होईल आणि जैवविविधतेला चालना मिळेल.
नव्या प्रकल्पामुळे विजयदुर्गला जागतिक पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व प्राप्त होईल. विजयदुर्ग हा प्रकल्प भारताच्या पर्यटन नकाशावर एक अनोखा ठिकाण म्हणून उदयास येईल. हा देशातील पहिला ‘अंडरवॉटर म्युझियम’ आणि ‘आर्टिफिशियल रीफ’ असलेला पर्यटन प्रकल्प असेल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल.
विजयदुर्ग समुद्रात बुडवण्यात येणारी ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका केवळ ऐतिहासिक वारसा नव्हे, तर पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.