मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडल्या असून, जानेवारी 2026 मध्ये उर्वरित सर्व निवडणुका—महानगरपालिकांसह—होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय चित्र स्पष्टपणे दोन ध्रुवांमध्ये विभागले गेले आहे.
काँग्रेसप्रणीत चार–पाच पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वाची लढाई लढत आहे, तर भाजपप्रणीत चार–पाच पक्षांची महायुती वर्चस्वासाठी मैदानात उतरली आहे. परिणामी, महाराष्ट्रात राजकीय ध्रुवीकरण अधिक तीव्र झाले आहे.
या परिस्थितीत, महायुती व महाविकास आघाडीच्या बाहेर राहून स्वतंत्र धोरणे व कार्यक्रम असलेले, तसेच दलित–आदिवासी–ओबीसी–गरीब आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या न्याय, हक्क व सशक्तीकरणाचे राजकारण करणारे छत्रपती शिवाजी महाराज–महात्मा फुले–राजर्षी शाहू महाराज–डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारेतील सर्व राजकीय पक्ष व नेत्यांनी स्वअहंकार आणि परस्पर मतभेद बाजूला ठेवून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रितपणे लढवाव्यात, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक–अध्यक्ष ॲड. (डॉ.) सुरेश माने यांनी केले.
मुंबई प्रदेशातील बी.आर.एस.पी. प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
डॉ. माने पुढे म्हणाले की, सध्या राज्यात महायुती व आघाडीमध्येच चार–पाच प्रमुख पक्ष असल्याने इतर राजकीय पक्षांना जागा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय, हे दोन्ही गट प्रस्थापितांचे राजकीय प्रतिनिधी असून त्यांना स्वतंत्र आंबेडकरी, दलित, आदिवासी किंवा ओबीसी राजकारण नकोच आहे. त्यामुळे दलित–आदिवासी–ओबीसी–अल्पसंख्यांक पक्षांना हेतुपुरस्सर डावलण्याचे राजकारण राज्यभर केले जात आहे.
हीच बाब शोषित-वंचित वर्गांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध राजकीय पक्ष व संघटनांना एकत्र आणणारा समान दुवा ठरू शकते. जर हे सर्व घटक एकत्र येऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरे गेले, तर हे दलित–आदिवासी–ओबीसी–मुस्लिम राजकारणाचे प्रभावी शक्तिकेंद्र बनू शकते.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी अशा व्यापक आणि रचनात्मक एकत्रित राजकीय धोरणाचा पुरस्कार करते, असे स्पष्ट करताना डॉ. माने यांनी सांगितले की “अलीकडेच विदर्भात गडचिरोली आणि नागपूर ग्रामीण नगर परिषद निवडणुकांमध्ये असे एकत्रीकरण घडून आले असून, त्यातून सकारात्मक राजकीय संकेत मिळाले आहेत.”
त्यामुळे, समदुःखी व समविचारी राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकजुटीने या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत उतरावे, असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले.

