मुंबई – राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या गुणांची अट शिथिल करण्याचा मोठा निर्णय आज कृषी विभागाने घेतला आहे. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्केची पूर्व अट शिथिल करून किमान ४५ टक्के, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुण आवश्यक राहणार असल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, “इच्छुक विद्यार्थी कृषी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणूनच आम्ही ही सुधारणा केली आहे,” असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
या निर्णयावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या ११८व्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
सध्याच्या नियमांनुसार, बीएस्सी (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि सामुदायिक विज्ञान या ९ प्रमुख पदवी अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावी (विज्ञान) मध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक होते. मात्र अनेक विद्यार्थी ही अट पूर्ण करू न शकल्याने ते प्रवेशापासून वंचित राहत होते.
“नवीन सुधारणेमुळे विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षणाची दारे खुले होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२५ निश्चित केली असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी,” असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.