मुंबई
2023 वर्षाच्या तब्बल सहा महिन्यांनी एक नाव समोर आलं आणि त्या चेहऱ्याने अख्खा महाराष्ट्र व्यापून घेतला. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं शस्त्र उगारणारे मनोज जरांगे पाटील हे 2023 चे हिरो ठरले असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
गेल्या चार महिन्यांपूर्वी कोणालाही फारसे माहीत नसलेले जरांगे पाटील 2024 च्या सुरुवातील अख्खा महाराष्ट्रभरात चर्चिले जात आहे. जाणून घेऊया कसा होता त्यांचा प्रवास…
जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या उपोषनानंतर चर्चेत आले.
महापुरुषांच्या पुस्तकांनी बदललं आयुष्य
बीड जिल्ह्यातील मातोरी हे पाटलांचा गाव. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर गेवराईच्या महाविद्यालयात बारावीपर्यंतच शिक्षण झालं. बारावीनंतर त्यांनी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला, मात्र त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं नाही. त्याऐवजी वडिलांना शेतात मदत करत होते.
त्यादरम्यान त्यांनी महापुरुषांबद्दलची अनेक पुस्तकं वाचली. गावात महापुरुषांनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाषणं करू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी २०११ मध्ये शिवबा या संघटनेची स्थापना केली. २०१६ पर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यात त्यांच्या संघटनेच्या शाखा सुरू झाल्या.
पत्नीला थेट लग्नातच पाहिलं…
जरांगे पाटील यांच्या मामाचं गाव अंबड तालुक्यातील अंकुशनगर. लग्नानंतर त्यांनी अंकुशनगर येथे दीड एकर जमीन घेऊन शेती सुरू केली. आणि इथच छोटेखानी घर घेतलं. मामांनीच त्यांच लग्न जमवलं. जरांगे पाटील यांनी मात्र पत्नीला थेट लग्नातच पाहिले. सामाजिक कामाचा व्याप वाढल्याने त्यांनी शेती करणं शक्य झालं नाही. अशावेळी पत्नी सौमित्राने शेती आणि मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं.
संघटनेसाठी विकली दीड एकर जमीन
2011 मध्ये शिवबा संघटनेचे राज्यभर दौरे सुरू झाले. यासाठी त्यांनी जुनी टाटा सुमो आणि जुनीच इंडिगो कार घेतली. पुढील दोन ते तीन वर्षात संघटनेचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र त्यानंतर पैशांची अडचण भासू लागली. यासाठी त्यांनी अंकुशनगर येथील दीड एकर जमीन विकली.
एप्रिल 2023 च्या उपोषणाने महाराष्ट्राला ओळख…
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी अंबड येथील वडीकाळ्या गावात एप्रिल 2023 मध्ये बेमुदत उपोषण केले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची दखल घेत मंत्रालयात बैठक बोलावली.