जालना
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
गेल्या पाच दिवसात त्यांनी पाणीही घेतलेलं नाही. आज त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी विनंती करूनही ते अन्न-पाणी घेण्यास तयार नसलयाचं सांगितलं जात आहे. दरम्यान सराटीत मराठा बांधवांची गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मराठा बांधव राज्यसरकारला जरांगे पाटलांकडे लक्ष देण्याची मागणी करीत आहे. त्यांच्या जीवाला काही झालं तर त्यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असाही आरोप बांधकांकडून केला जात आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव येत असल्याने मराठा बांधवांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डॉक्टरांकडूनही ही बाब गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठा समाजाकडून बंदची हाक
राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा बांधवांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी जारी केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली जात आहे. आज जालना, बीड, सोलापूर आणि नाशिकमधील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज उत्तर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज बांधवाकडून सोलापुरातील कोंडी गावात ही बंद पुकारला आहे.