महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यात चार भूकंपाचे धक्के; हिंगोली, नांदेड, परभणी, लातूरमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत जाणवलेल्या भूकंपानंतर घराबाहेर जमलेले नागरिक.

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत गुरुवारी (९ जुलै) पहाटे अवघ्या दोन तासांच्या कालावधीत चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसली तरी अनेक नागरिकांनी घराबाहेर रात्र काढली.

हिंगोली : मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी (९ जुलै) पहाटे अवघ्या दोन तासांच्या कालावधीत चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसली, तरी अनेकांनी भीतीपोटी घराबाहेर रात्र काढली. या घटनेमुळे १९९३ च्या किल्लारी भूकंपाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत तालुक्यांत गेल्या सहा वर्षांत ३७ हून अधिक सौम्य भूकंपांची नोंद झाली आहे. मात्र अवघ्या दोन तासांत सलग चार धक्के जाणवण्याची ही पहिलीच घटना असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

पहिला धक्का पहाटे १.३७ वाजता बसला. त्याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असून, भूकंपाचे केंद्रबिंदू सिर्ली–पांगरा शिंदे परिसरात असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर होती.

यानंतर २.१५ वाजता दुसरा धक्का बसला. त्याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. या धक्क्याचा केंद्रबिंदू काकडधाबा परिसरात नोंदविण्यात आला असून, त्याची खोलीही १० किलोमीटर असल्याची माहिती मिळाली.

दुसऱ्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी एकमेकांना दूरध्वनी करून भूकंप झाल्याची खात्री करून घेतली. काही मिनिटांतच पहाटे २.१७ वाजता तिसरा धक्का बसला. त्याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली.

त्यानंतर पहाटे ३.२३ वाजता चौथा धक्का जाणवला. त्याची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचाही केंद्रबिंदू काकडधाबा परिसरात असल्याचे सांगण्यात आले. सलग चार धक्क्यांमुळे अनेक नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर, अंगणात किंवा मोकळ्या जागेत थांबून रात्र काढली.

यापूर्वी ११ एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यामुळे या भागातील नागरिक आधीच सतर्क आहेत. चार किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे, कळमनुरी आणि औंढा नागनाथ परिसरात हे धक्के अधिक तीव्रतेने जाणवले. गेल्या काही वर्षांत या भागात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने भूगर्भीय अभ्यास आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विशेष पाहणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या भूकंपाचे धक्के नांदेड, परभणी तसेच लातूर जिल्ह्यांतील काही भागांतही जाणवले. विशेषतः लातूर शहर आणि निलंगा परिसरातील नागरिकांनी धक्के जाणवल्याची माहिती दिली. तथापि, प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

काही ग्रामस्थांनी भीतीचे वातावरण असताना अधिकृत स्तरावर तत्काळ जनजागृती किंवा सूचना करण्यात आल्या नसल्याची तक्रार केली. मात्र प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी तातडीने मोकळ्या जागेत जावे, विशेषतः दगड-मातीच्या किंवा कच्च्या बांधकामाच्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

किल्लारीची आठवण पुन्हा ताजी

१९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या विनाशकारी भूकंपात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्या दुर्घटनेची आठवण आजही मराठवाड्यातील नागरिकांच्या मनात कायम आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवतात, तेव्हा किल्लारीच्या भीषण आपत्तीची आठवण अनिवार्यपणे जागी होते.

हिंगोलीसह मराठवाड्यात वारंवार जाणवणाऱ्या सौम्य भूकंपांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढत असून, या परिसरातील भूगर्भीय हालचालींचा सखोल अभ्यास करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandge) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे. Dr Abhaykumar Dandge — writer and analyst on Marathwada’s agriculture, rural economy and regional politics

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात