मुंबई : “मला एकवेळ शिव्या द्या, बदनाम करा; पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही,” असा सणसणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत विरोधकांना दिला.
सत्तारूढ पक्षांनी आणलेल्या नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सुमारे दीड तासांच्या उत्तरात त्यांनी मुंबई महापालिका, मुंबई आणि राज्यातील पावसाची परिस्थिती, पाणीटंचाई, मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याची घटना, स्वयं-पुनर्विकास, मोतीलाल नगर आणि अभ्युदय नगर म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास, धारावी पुनर्विकास, मुंबईतील मेट्रो प्रकल्प, वॉटर मेट्रो आणि इतर विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
“या सरकारला विकासात रुची आहे. सर्वसामान्यांच्या हितामध्ये रुची आहे. आमच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही; ते सुरूच राहील. मुंबई आणि एमएमआर क्षेत्र हे महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन मानून आमचे काम सुरू आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या सहा दिवसांत झालेला पाऊस जुलै महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक आहे. कुलाबा येथे ७३४ मिमी, तर सांताक्रूझ येथे ८५६ मिमी पावसाची नोंद झाली. संपूर्ण पावसाळ्यात जितका पाऊस होतो, त्याच्या सुमारे ४२ टक्के पाऊस केवळ चार दिवसांत मुंबईत झाला, असे त्यांनी सांगितले.
पूरनियंत्रणासाठी मुंबईत ९०९ पंप कार्यरत असल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईतून ८० टक्के गाळ काढण्यात आला, तर मिठी नदीतून ८३ टक्के गाळ काढण्यात आला. “यापूर्वी नालेसफाईत दरवर्षी घोटाळ्याची प्रकरणे समोर येत होती. आता खोटे दावे करणे आणि निविदा काढणे हे होणार नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईतील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तेरा हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Dannielle Chrisco
July 8, 2026I always was interested in this topic and still am, thanks for posting.