मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha )मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमदेवार छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . यावेळी शाहू महाराजांचे संपूर्ण कुटुंबीय शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी कोल्हापूरचा एकच आवाज..शाहू महाराज…शाहू महाराज अशा घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला . दरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी छत्रपती शाहू महाराज यांनी दसरा चौकातील राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूकीस सुरुवात केली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक त्यामध्ये महिलांही अधिक संख्येने सहभागी झाल्या होत्या .
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शाहू महाराज छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.. या मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार देण्यात आलेला नाही. तर वंचितने शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान आज छत्रपती शाहू महाराज यांनी तीन अर्ज दाखल केले . यावेळी मिरवणूकीत घटक पक्षांच्या झेंड्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षि शाहू छत्रपती यांचे चित्र असलेले भगवे ध्वज सर्वात जास्त होते. त्याबद्दलही लोकांत उत्सुकता होती. तसेच सजवलेल्या गाडीवर शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, व्ही.बी.पाटील, विजय देवणे, विश्वास पाटील, ए.वाय.पाटील, स्वाती शिंदे, आपचे संदिप देसाई, मधुरिमाराजे आदींसह आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले. काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादी पवार गट, शेतकरी कामगार पक्ष. डावे पक्ष, आपचे कार्यकर्ते मिरवणूकीत सहभागी झाले होते .
याआधी या मतदारसंघात संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, शाहू महाराजांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी त्यांना पाठिंबा देत, आपण त्यांच्यासाठीच प्रचार करण्यात असल्याचे जाहीर केले . महाविकास आघाडीच्या वतीने शाहू महाराजांना उमेदवारी देण्यास तिन्ही घटक पक्षांनी सकारात्मकता दाखवली होती. मात्र, शाहू महाराजांनी आपण काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याची इच्छुक असल्याचे जाहीर केले. त्यानुसार महाआघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला . आता या मतदारसंघात कोणाची बाजी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .