मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले असून “माझी वसुंधरा” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील २८,३२८ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.
नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, सध्याचे दशक हे इतिहासातील सर्वात उष्ण दशक ठरत आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वाढलेले तापमान आणि वाढते कार्बन उत्सर्जन यामुळे महाराष्ट्रास मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असून राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि नदी प्रदूषण नियंत्रणावर भर दिला जाणार आहे.
राज्यातील ४३ अमृत शहरांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी विशेष आराखडे तयार करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
२०३५ पर्यंत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बसांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल. सध्याच्या बसेस या शेवटच्या असून, त्यानंतर येणाऱ्या सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील.
“२०३५ पर्यंत महाराष्ट्र पूर्णपणे इलेक्ट्रिक एसटी बस प्रणालीकडे वळणारे पहिले राज्य ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्करोग तपासणीसाठी मोठी मोहीम
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, कर्करोग तपासणी आणि निर्मूलनासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत २.९१ लाख महिलांची तपासणी करण्यात आली असून, ९.८४ लाख मुलींना मोफत एचपीव्ही लस देण्यात आली आहे.
३० वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महात्मा फुले आणि आयुष्मान भारत योजनांतर्गत कॅन्सर उपचार पॅकेज देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी तज्ञ डॉक्टरांशी संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

