By Vivek Bhavsar
X : @vivekbhavsar
मुंबई
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही कामे होत नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा स्फोट आज विधानभवनात झाला. आमदार महेंद्र थोरवे आज थेट मंत्री दादा भुसे यांच्या अंगावर धावून गेले. मंत्री शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, विधान भवनात असंख्य लोकप्रतिनिधी आणि लोकांसमोर हा प्रकार घडल्याने शिंदे गटाच्या इभ्रतीचे जाहीर धिंडवडे निघाले आहेत.
कोकणातील भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र थोरात हे एकनाथ शिंदे समर्थक त्रिकुट त्यांच्या आक्रमकपणासाठीच ओळखले जातात. काम करून घेण्यासाठी ते प्रसंगी मंत्र्यांना सुनावण्यास कमी पडत नाही अशी चर्चा मंत्रालयात आहे.
निवडणूक तोंडावर आल्याने सरकारने जाहीर केलेला निधी मिळत नसल्याने सर्वच आमदार नाराज आहेत. नगर विकास विभागाच्या किमान २० हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र, सरकारच्या तिजोरीत निधी नसल्याने जून मध्ये पुरवणी मागण्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यानंतरच या निधीचे वाटप होईल, असे आश्वासन देऊन आमदारांना वाटण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहेत.
हा विषय केवळ नगरविकास विभागच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ या विभागातही सरकारची डोकेदुखी ठरत आहे. आपला मुख्यमंत्री असूनही आपल्याला निधी मिळत नसेल तर काय अर्थ अशी तक्रार एकनाथ शिंदे समर्थक आमदार करत आहेत.
निधी मिळत नसल्याने मतदारसंघातील कामे होत नाहीयेत. या नाराजीचा कडेलोट आज विधानभवनात झाला. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे विधान भवन सभागृहातून बाहेर पडत असलेल्या मंत्री दादा भुसे यांच्याशी लॉबीमध्ये थेट भिडले.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार थोरवे यांनी दादा भुसे यांचा असंसदीय भाषेत यथेच्छ उद्धार केला. दोघांत शाब्दिक चकमक घडली. अरे तुरे च्या भाषेत एकमेकांबद्दल जाहीर वक्तव्ये केली गेली. आसपास कोण आहेत, कोण त्यांच्या या वादाचे साक्षीदार होत आहेत, याचे भान दोघानाही नव्हते. अखेर मंत्री शभुराज देसाई यांनी मधस्थी करून पुढील अनर्थ टाळला. मात्र, तोपर्यंत या वादाची बातमी वाऱ्याच्या वेगाने विधान भवन परिसरात पोहोचली होती.
आडमस्तरांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सोलापूर मध्य मतदार संघावर दावा - Rajkaran
March 1, 2024[…] Also Read: मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्… […]