X : @vivekbhavsar
मुंबई – बाराव्या इयत्तेत 90 टक्के गुण मिळाले, परंतु, घरची परिस्थिति हलाकीची, नापीक शेती, उत्पन्नाचे काही साधन नाही, आई – वडिलांना किती काळ आर्थिक अडचणीत आणायचे, आणि आता उच्च शिक्षण (higher education) घेणे शक्य होणार नाही, या विचाराने निराश झाल्याने ‘त्या’ विद्यार्थिनीने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, विष प्राशन ही केले, पण तीचे दैव बलवत्तर असावे म्हणून दवाखान्यात तिला वाचवणे शक्य झाले. यासाठी देवदूतासारखे तिच्या मदतीला धावून आले, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ प्रा तानाजी सावंत (Dr Tanaji Sawant) . डॉ सावंत केवळ तीचे प्राण वाचवून थांबले नाहीत तर तिच्याशी विडियो कॉलद्वारे संपर्क साधून धीर दिला आणि “तुझ्या उच्च शिक्षणाची जबाबदारी माझी आहे,” अशा शब्दात आश्वस्त केले.
धारशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात अंतरगाव येथील अनुराधा सहदेव गोरे या विद्यार्थिनीला बारावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळाले. परंतु, घराची आर्थिक परिस्थिति बिकट असल्याने पुढे शिक्षण घेता येणार नाही, या विचाराने चिंतित झालेल्या अनुराधाने विष प्राशन केले. सुदैवाने ही बाब तिच्या वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी तिला तातडीने बार्शी येथील जगदाळे मामा यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
या दुर्घटनेची माहिती शिवसेनेचे अंतरगाव येथील उपतालुका प्रमुख रामराजे गोरे यांनी तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ यांना दिली. गुंजाळ यांनी तातडीने ही माहिती मंत्री तानाजी सावंत यांना दिली. मंत्री सावंत यांनी डॉक्टरांशी बोलून योग्य ते उपचार करण्याच्या सुचना दिल्या. सकाळी घडलेल्या या घटनेनंतर आणि वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने अनुराधा संध्याकाळी बोलण्याच्या स्थितीत आली.
तालुकाप्रमुख गुंजाळ यांनी मोबाइल वर विडियो कॉल करून अनुराधा आणि मंत्री सावंत यांचे बोलणे करून दिले. प्रस्तुत प्रतिनिधीच्या समक्ष घडलेल्या या सांभाषणानंतर मंत्री सावंत यांना अश्रु अनावर झाले होते. पालक मुलांना वाढवतात, मोठे करतात आणि मुले एका नाजुक क्षणी आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याचा प्रयत्न करतात, यात दुर्दैवाने कधी विपरीत घडले तर पालकांनी उर्वरित आयुष्य कोणाकडे पाहून जगावे, याचे उत्तर नसते, अशी भावनिक प्रतिक्रिया मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केली.
आर्थिक अडचणीमुळे मुले, मुलींना पुढचे शिक्षण घेता येत नाही, अशा मुलांचे पालक आम्ही बनतो आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो, असे मंत्री सावंत म्हणाले. दरम्यान, मंत्री सावंत यांच्याशी बोलताना अनुराधा गोरे हिने ही सांगितले की तिला तिच्या पालकांसाठी पुढे उच्च शिक्षण घ्यायचे आहे. सावंत यांनी तिला पालक या नात्याने झालेली चूक आणि भविष्यात काय करायचे आहे, हे समजावून सांगितले. तसेच तिच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेत असल्याची ग्वाही दिली.