X : @ajaaysaroj
मुंबई: ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते, निर्माते व राज्यसभेचे माजी खासदार मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासह प्रसिद्ध गायिका उषा उत्थप यांचा देखील, राष्ट्रपती मुर्मु यांच्याहस्ते पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. मिथुनदा यांचे फाईट सीन्स व डिस्को नृत्याला वाहिलेले चित्रपट आणि त्यातील उषा उत्थाप यांची वेगळ्या धर्तीची गाणी म्हणजे एकेकाळी चित्रपट सुपर हिट होण्याचे हमखास समीकरणच समजले जायचे. या दोन्ही श्रेष्ठ व ज्येष्ठ कलाकारांना एकत्र पद्मपुरस्कार मिळणे हा योगायोगच म्हणावा लागेल.
१६ जून, १९५० रोजी गौरांग यांचा चक्रवर्ती कुटुंबात जन्म झाला. त्यांनी नंतर मिथुन असे नाव घेतले. स्कॉटिश चर्च महाविद्यालयातून त्यांनी रसायन शास्त्राची पदवी प्राप्त केली. बंगालमधील नक्षलवादी चळवळीशी त्यांचे नाव काही काळ जोडले गेले होते, पण त्यांच्या भावाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर मिथुनदा आपल्या कुटुंबात परत आले. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी नंतर अभिनयाचे धडे घेतले व चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांचा स्वतःचा असा एक खूप मोठा चाहता वर्ग त्यांनी निर्माण केला. फक्त भारतातच नाही तर परदेशात ही त्यांनी आपला फॅन बेस निर्माण केला. रशियात तर राज कपूर यांच्या इतकेच चाहते मिथुनदा यांचे आहेत असे बोलले जाते.
गेली ४८ वर्षे चित्रपट सृष्टीत काम करत असताना, त्यांनी तब्बल साडेतीनशे चित्रपटात आजपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली असून, मृगया, ताहादेर कथा, आणि स्वामी विवेकानंद या तीन चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या व्यतिरिक्त हिंदीतील विविध चित्रपटांसाठी देखील त्यांना चार फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट सृष्टीत ज्युनियर आर्टिस्ट आणि डान्सर्स यांच्यासाठी त्यांनी खूप मोठया प्रमाणावर केलेल्या कामामुळे त्यांचा शब्द या क्षेत्रात अंतिम मानला जातो. ते सहा वर्षे राज्यसभेत खासदार देखील होते. अनेक सामाजिक संस्थांच्या मंडळावर असलेल्या मिथुनदांनी या क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवला आहे.
मिथुनदा यांच्यासह मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उषा उत्थप यांचा देखील पद्मभूषण पुरस्कार देऊन राष्ट्रपती मुर्मु यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. ७ नोव्हेंबर १९४७ रोजी उषा यांचा मुंबईत जन्म झाला. भायखळा येथील सेंट अँगनेस हायस्कुलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. आपल्या अनोख्या आवाजाने या ज्येष्ठ गायिकने देशातच नव्हे तर परदेशातील हजारो चाहत्यांवर आपल्या गाण्याची मोहिनी घातली आहे. त्यांची स्वतःची अशी एक राहण्याची फॅशन शैली त्यांनी निर्माण केली, ती इतकी प्रसिद्ध झाली की संपूर्ण देशभरात ती फॅशन स्टेटमेंट म्हणून मानली जाऊ लागली. भारतात डिस्को, पॉप, आणि जॅझ गाण्यांना उषा उत्थाप यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आजपर्यत शेकडो गाण्यांनी त्यांनी रसिकांना वेड लावले आहे. त्यांच्या आवाजाचा बेस आणि गायकीची लकब वेगळीच असल्याने त्यांनी स्वतःचा एक उच्च दर्जा नेहमीच राखला आहे.
देशातील तिसऱ्या स्थानावर असलेल्या सर्वोच्च पद्मभूषण या पुरस्काराने, रसिकांचे अलोट प्रेम लाभलेल्या दोन दिग्गज कलाकारांना शासनाने आज गौरवले असून सर्वच रसिकांच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण आहे.